GUJRAT VIDHANSABHA ELECTION 2022 : गुजरातमध्ये येत्या डिसेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होईल. विधानसभा निवडणणुकांपूर्वी घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमधून यंदाही येथे भाजपकडे ( BJP ) सत्तेच्या चाव्या राहतील असे कल वर्तवण्यात आले आहेत. अशातच आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल ( ARVIND KEJRIWAL ) यांनी निवडणुकांचे निकाल काय लागणार याबाबत भाकीत केलं आहे. केजरीवाल यांनी केलेलं हे भाकीत खरं ठरल्यास काँग्रेससाठी मात्र हा मोठा धक्का असणार आहे.
काय म्हणाले केजरीवाल? | ARVIND KEJRIWAL ON CONGRESS
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी, आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत भाकीत नोंदवलं. विधानसभा निवडणणुकांचे निकाल काय लागणार असा प्रश्न विचारण्यात आला असता केजरीवाल यांनी, कागद व पेन मागवून घेत गुजरातेत काँग्रेसला केवळ ५ जागा मिळतील असे भाकीत केले. २०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात ७७ जागा मिळाल्या होत्या.
गुजरातमध्ये सत्ता कोणाची? | GUJRAT VIDHANSABHA ELECTION 2022
काँग्रेसबाबतचे भाकीत कागदावर लिहून दिल्यानंतर केजरीवाल यांना, राज्यात कोणाची सत्ता येणार? आम आदमी पक्ष पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या स्थानावर राहणार? असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी, आम आदमी पक्ष गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचे भाकीत केले.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे निकाल काय सांगतायेत? | GUJRAT VIDHANSABHA ELECTION 2022
आम आदमी पक्षाने राज्यात प्रचारामध्ये व उमेदवार घोषित करण्यामध्ये जरी आघाडी घेतली असली तरी निवडणूकपूर्व सर्वेक्षणांच्या निकालामध्ये मात्र आपला पसंती मिळालेली नाही. बहुतांश चाचण्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असून काँग्रेस दुसऱ्या तर आम आदमी पक्ष तिसऱ्या स्थानावर राहणार असल्याचे दिसते.