पुणे -शहरातील नाट्यगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मैदानात उतरले असून येत्या गुरुवारी (दि.1जून) रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत नाट्यगृहांच्या समस्यांबाबत प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार असून त्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांचा आराखडा तयार केला जाणार आहे. या बैठकीसाठी नाट्यगृहांच्या सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनाही या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शहरात महापालिकेची 13 प्रमुख नाट्यगृहे असून त्यातील तीन ते चार नाट्यगृहांना नाट्यसंस्थांकडून पसंती दिली जात आहे. त्यात, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, घोले रस्ता येथील पंडित नेहरू सांस्कृतिक केंद्र तसेच गणेश कला क्रीडा मंचाचा समावेश आहे. मात्र, या नाट्यगृहांच्या ठिकाणी पाणी, स्वच्छता, पार्किंग, वातानुकूलित सेवा, अपुरे मनुष्यबळ तसेच नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने नाट्यगृहांबाबत नाट्य प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेकडून नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीवर लाखोंचा खर्च केला जात असतानाही ही दुरवस्था असल्याने महापालिकेस मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, नाट्यगृहांच्या समस्यांसाठी ही बैठक बोलविण्यात आली.
प्रशासन लागले कामाला
दरम्यान, नाट्यगृहांच्या समस्येबाबत माध्यमातून वारंवार समस्यांचा पाढा वाचला जात असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी बैठक बोलावताच महापालिकेचा सांस्कृतिक विभाग आणि भवन विभाग कामाला लागला असून नाट्यगृहांच्या सुधारणांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत नाट्यगृहांसाठी निधी नाही, असा आरडाओरडा करणाऱ्या प्रशासनाकडून अंदाजपत्रकातील क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ तसेच मुख्य खात्याच्या निधीतून नाट्यगृहांच्या समस्या सोडविण्यासाठीचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.