रस्त्यावर आता नवीन रिक्षा येणार नाहीत ! परिवहन विभागाकडून परवाना होणार बंद

पुणे -पुणे शहर जसे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच पुण्यातील रिक्षा आणि रिक्षावाले यांचीही मोठी चर्चा राज्यभरातच नव्हे तर अगदी परदेशातही होत असते. शहरात विशिष्ट पद्धतीने सजविलेल्या रिक्षा, जुन्या रिक्षा, आधुनिक पद्धतीच्या रिक्षा रस्त्यांवरून धावताना दिसतात. शहरातील एकही रस्ता असा नाही की जेथे काळी-पिवळी रिक्षा दिसत नाही. एकही चौक असा नाही की जेथे रिक्षा स्टॅन्ड नाही. शहरातील रिक्षांचे “धावते’ विश्वच वेगळे आहे. परंतु, आता आगामी काळात शहरात एकही नवी रिक्षा रस्त्यावर येणार नाही. याला कारणही तसेच आहे. शहरातच नव्हे तर आगामी काळात राज्यातच नवीन रिक्षांना परवाना देणे थांबविले जाणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरांसह पुणे शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी नियंत्रणासाठी परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाकडेही पाठविला आहे. मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर राज्यासह पुणे शहरात नवीन रिक्षांना परवाना देणे बंद करण्यात येणार आहे.
राज्यातील रिक्षांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने यावर नियंत्रणाबाबत अनेक रिक्षा संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. यामुळे परिवहन विभागाने सदर प्रस्ताव तयार करीत तो मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठविला आहे. मंत्रालयाकडून यावर तातडीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यासह पुणे शहरात नवीन रिक्षांच्या परवान्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक रिक्षा पुण्यात…
पुणे शहर हे रिक्षांचे शहर म्हणूनही ओळखले जात असताना येथील रिक्षा चालकांचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. गेल्या दोन दशकांत शहरातील रिक्षांची संख्या वाढल्याचे आरटीओकडील नोंदीतून दिसते. राज्यभरात 8 लाख रिक्षा असताना त्यातील सर्वाधिक म्हणजे एक लाख रिक्षा पुण्यात आहेत. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये 32 हजार 500 रिक्षा असल्याची नोंद आहे.





