सॅन होजे (कॅलिफोर्निया): गुगलच्या अनेक टूल्सपैकी सर्वसामान्यांच्या वापरातील आघाडीचे टूल म्हणजे गुगल मॅप्स. या गुगल मॅप्सवर बहुतांश सर्व देशांतील नागरिक “लोकल गाईड’ म्हणून स्वछेने माहिती अपडेट करत असतात. अशा जगभरातील निवडक लोकल गाईड्सची एक आंतरराष्ट्रीय परिषद प्रतीवर्षी ऑक्टोबर महिन्यात गुगल मॅप्सच्या मुख्यालयात आयोजित केली जाते. मात्र, सध्याचा करोनाव्हायरसचा प्रादुर्भाव आणि कोव्हिड्19 मुळे अमेरिकेतील बनलेली विदारक परिस्थिती पाहता, यावर्षी तरी “लोकल गाईड्स कनेक्ट’ ही तीन दिवसीय परिषद रद्द केली जात असल्याची माहिती, गुगलने एका ई-मेलद्वारे सर्व इच्छुक आणि पात्र लोकल गाईड्सना दिली आहे.
गुगल मॅप्सची अचुकता वाढावी म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक स्थानिक नागरिक मॅप्सवर माहिती अपडेट करत असतात. त्यामध्ये मॅपवरील चुकीची माहिती दुरुस्त करणे, एखादे दुकान कायमस्वरुपी बंद झाले अथवा स्थलांतरित झाले किंवा एखाद्या ठिकाणी जुनी इमारत पाडून नवी इमारत उभी राहिली असेल, तर अशी माहिती हे लोकल गाईड्स गुगल मॅपवर देत असतात. तसेच ठिकठिकाणी काढलेली छायाचित्रे, व्हिडीओज त्या-त्या ठिकाणावर मॅपमध्ये अपलोड करणे, मॅप्सकडून येणाऱ्या विविध माहितीपर प्रश्नांची उत्तरे देणे, एखाद्या ठिकाणाला स्टार रेटींग देत त्याविषयी रिव्ह्यु लिहिणे, अशा अनेक गोष्टी मॅप्सच्या लोकल गाईड कम्युनिटी माध्यमातून केल्या जातात.
या प्रत्येक गोष्टीसाठी लोकल गाईडसना पॉईंट्स दिले जातात. या पॉईंटच्या बळावर अशा लोकल गाईड्सना विविध ऑफर्स दिल्या जातातच, शिवाय त्यातील निवडक 150 ते 200 लोकल गाईड्ससाठी प्रतिवर्षी गुगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात तीन दिवसांची एक परिषद भरवली जाते. विशिष्ट गुणांची/पॉईंटसची मर्यादा पार करणाऱ्या हजारो लोकल गाईड्समधून ही निवड केली जाते.
जर एखाद्या लोकल गाईडची या परिषदेसाठी निवड झाली, तर त्याचा त्याच्या सोयीच्या ठिकाणापासून अमेरिकेला जायचा-यायचा विमानप्रवासाचा खर्च, व्हिसा फी आणि तीन दिवसांचा सॅन होजेमधला पाहुणचार असा सर्व खर्च गुगलकडून केला जातो.
या परिषदेमध्ये गुगल मॅप्सची विविध फिचर्स, आडवाटेवरची पर्यटनस्थळे आणि सहभागींचा गुगल मॅप्सबाबतचा अनुभव अशा विविध विषयांवर सादरीकरण होत असते. शिवाय अनेक रेडबस, ओयो हॉटेल्स किंवा काही ऍप्स खरेदी करण्यासाठी व्हाऊचर्सही पाठवली जातात.