मुंबई – देशभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. रुग्णालये फुल्ल झाली असून रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळवणं दुरापास्त झालं आहे. त्यातच मृत्यूदर वाढला आहे. मात्र मृत्यूदर वाढण्याची कारणं उशिरा चाचणी करणं हे ठऱत आहे. तर अनेक ठिकाणी चाचणी केल्यानंतरही अहवाल लवकर येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी टाटा समूहाने महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसीत केलं आहे.
मुंबईत टाटा समूहाने करोना तपासणीसाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. क्रिस्पर कॅस अस या तंत्रज्ञानाचे नाव आहे. यामुळे आता रुग्णांचा स्वॅब अहवाल जास्त अचूक आणि गतीने मिळणार आहे. मुंबई आणि पुण्यात अशा दोन ठिकाणी या तंत्रज्ञानाद्वारे चाचणी केली जात आहे. येत्या शुक्रवारपासून याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यात लॅब सुरु केली जाणार आहे. क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी भारतातील पहिली लॅब ठरली आहे.
क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासांत रिपोर्ट येतो. याद्वारे २४ तासांत कमीत कमी 500 ते 2000 तपासण्या एका लॅबमध्ये केल्या जाऊ शकतात. तसेच स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईलवर एक ॲप तयार करून दिले आहे. त्यात त्याची माहिती भरल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट तयार होतो. तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. विशेष म्हणजे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युके, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरियंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत.