नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच 8 डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनच्या देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
डब्लूएचओने म्हटले आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. “कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे,” असे डब्लएचओचे वरिष्ठ अधिकारी मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले.
डब्लूएचओने आपल्या आणि जगभरातील तज्ज्ञांद्वारे फायजर लसीच्या ‘सुरक्षा, प्रभावी आणि गुणवत्तेच्या माहितीची पडताळणी केली. याचे फायदे आणि जोखिमांचे मूल्यांकन केले. डब्लूएचओने निश्चित केलेल्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर ही लस परिणामकार ठरते, असे त्यांनी सांगितले.