मुंबई – वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा निर्णय ताजा असतानाच महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, एमबीबीएसचा अभ्यासक्रम इंग्रजित असल्याने अनेकांना हा कोर्स पूर्ण करणे अशक्य होते. मात्र आता हा अभ्यासक्रम मराठीत येणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय पॅनेलचे प्रमुख वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले हे असणार आहेत. या समितीची पहिली बैठक पुढील आठवड्यात मुंबईत शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील.
राज्यात एमबीबीएसचे शिक्षण देणारी 62 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये पुढील काळात मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाईल. इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दरम्यान, मराठी माध्यमातील आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा इंग्रजीतून वैद्यकीय शिक्षण घेताना अडचणी येतात. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो. यामुळे स्पर्धेच्या युगात असे विद्यार्थी मागे राहण्याची भिती असते. पण आता मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार असल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.