नवी दिल्ली – सोन्याचे दर सध्या तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून आणि दागिने खरेदी करणाऱ्यांकडून काही प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे सोन्याच्या दरात कालच्याप्रमाणे आज मापक वाढ झाली.
मात्र तरीही सोन्याचे दर 45 हजार रुपयांखाली रेंगाळले आहेत. दिल्ली सराफात सोन्याचा दर मंगळवारी 45 रुपयांनी वाढून 44,481 रुपये प्रति 10 ग्राम झाला. चांदीचा दर दिल्ली सराफात 116 रुपयांनी वाढून 66,740 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटी संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात आणि वायदे बाजारामध्ये सोन्याच्या दरात माफक वाढ झाली. त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,730 डॉलर प्रति औस तर चांदीचे दर 26.11 डॉलर प्रति औंस झाले.
सरकारी रोख्यांवरील वाढणारा परतावा, सुधारत असलेली आर्थिक परिस्थिती आणि महागाई या कारणामुळे डॉलर वधारत आहे. परिणामी सोन्याचे दर कमी पातळीवर आहेत. नजीकच्या भविष्यामध्ये सोन्याचे दर फार प्रमाणात वाढणार नाहीत, असे काही विश्लेषकांनी सांगितले आहे.
आठ महिन्यापूर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते. भारतात दागिन्यासाठी सोन्याची खरेदी बऱ्याच प्रमाणात केली जाते. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा नागरिकांसाठी सोने खरेदी उपयुक्त ठरेल असे विश्लेषकांना वाटते.