पुणे – देशभरातील भांडवलदरांच्या खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन त्याची विक्री करण्याचा मोठा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने उधळला. या डेटा चोरी आणि विक्रीच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले. या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये स्विकारताना 10 जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघेजण नामांकीत कंपन्यांमध्ये संगणक अभियंते आहेत.
रविंद्र महादेव माशाळकर (वय 34), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34) मुकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34), रोहन रवींद्र मंकणी (37), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42), परमजित सिंग संधू (42), अनघा अनिल मोडक (वय 40) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अन्य दोघांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
विविध बॅंकांमध्ये असलेल्या नागरीकांच्या सक्रीय व निष्क्रीय बॅंक (डोरमॅट अकाऊंट) खात्यासंबंधीची गोपनीय माहिती संबंधीत आरोपींनी संगनमत करून अनधिकृतरीत्या मिळविली. संबंधीत माहितीचा वापर करून नागरीकांच्या बॅंक खात्यांमध्ये असणारी रक्कम आरोपी इतर खात्यांमध्ये वळवून फसवणूक करणार होते. आरोपींकडे असलेल्या बॅंक खातेदारांच्या खात्यांमध्ये तब्बल 216 कोटी 29 लाख रुपये इतकी रक्कम होती.
चोरलेली हीच गोपनीय माहिती आरोपी एका व्यक्तीला विक्री करणार होते. मात्र, या प्रकरणाची कुणकुण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला आठ दिवसांपुर्वी मिळाली. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी संबंधीत आरोपी सिंहगड रोड परिसरामध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी साध्या वेशात, तसेच वेगवेगळी वेशभुषा करून आरोपी थांबलेल्या परिसरात सापळा रचला. त्यानंतर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून 11 मोबाईल फोन, 25 लाख रुपयांची रोकड, दोन कार, एक दुचाकी, असा तब्बल 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
“”बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन सव्वा दोनशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यापुर्वीच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून काही जणांना अटक केली आहे. संबंधीत प्रकरण मोठे असून या प्रकरणातीम मुख्य आरोपी दोन दिवसात ताब्यात घेतले जाणार आहेत.”
-भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा.