नवी दिल्ली – करोना व्हायरसचा खात्रीने मुकाबला करू शकणाऱ्या लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाला चांगले दिवस येतील या दृष्टिकोनातून गुंतवणूक सोन्याकडून शेअरबाजाराकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर सध्या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत.
मंगळवारी सोन्याचे दर 1,049 रुपयांनी कमी होऊन 48,569 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचे दर 1,588 रुपयांनी कमी होऊन 59,301 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,830 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 23.42 डॉलर प्रति औंस या पातळीवर घसरले.
लस उपलब्ध होण्याबरोबरच अमेरिकेतील राजकीय परिस्थिती निवळत असल्यामुळे उद्योग – व्यापारविषयक वातावरण सकारात्मक झाले असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटी विश्लेषक तपन पटेल आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले.