सिस्टर लुसी कुरियन यांचे पोपना आवाहन
शिक्रापूर- वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांनी इटली देशातील व्हॅटिकन येथे एक आंतरधर्मीय संवाद परिषदेसाठी उपस्थित असताना पोप फ्रेंन्सिस यांची भेट घेऊन महिलांना पौरोहित म्हणून मान्यता देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वढू बुद्रुक येथील अनाथांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्था 1997 पासून सुरू आहे. महाराष्ट्रात पुणे, मिरज, रत्नागिरी, शिरुर आदी ठिकाणी बेघर व अनाथ महिला, पुरुष आणि लहान मुलांना आश्रय देत त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम ही संस्था करीत आहे. काही वर्षापासून संस्थेने केरळ व झारखंडमध्ये कामाला सुरूवात केली आहे. गरीबांतील गरीबांसाठी काम करण्याचे आवाहन यावेळी पोप फ्रेंन्सिस यांनी लुसी कुरियन यांना केले आहे. यावेळी महिलांना पौरोहित्याचे अधिकार देण्याची मागणी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी केली आहे.
ख्रिश्चन कॅथलिक समाजात अजूनही महिला पौरोहितांना मान्यता नाही. जगभरात अनेक कॅथलिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न आता उचलून धरला आहे. पोप यांच्याकडे मी या प्रश्नांची पुन्हा एकदा पुर्नरूच्चार केले असताना याला पोप फ्रेंन्सिस यांनी स्मितहास्याने उत्तर दिले आहे. महिलांना पौरोहित्याचे अधिकार मिळावेत, असे लेखी निवेदनही पोप फ्रेंन्सिस यांना दिले आहे. माहेर संस्थेबद्दल माहितीपर इटॅलियन भाषेतील पुस्तक त्यांना भेट दिले दिल्याचे लुसी कुरियन यांनी सांगितले.