सातारा -सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा श्री मलंगगडाचा बालेकिल्ला टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली सर करत सातारच्या गिर्यारोहकांनी वीर भगतसिंग यांना वंदन केले.
अभिमानाने तिरंगा फडकावित शहीद भगतसिंग अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत औषध निर्मात्यांच्या कार्याला सलाम करीत केलेली ही मोहीम भारतीय कन्यांना समर्पित केली.
राजगुरूनगर (पुणे) येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतीशिल्पासमोर नतमस्तक होऊन या मोहिमेसाठी गिर्यारोहक मार्गस्थ झाले. या मोहिमेची सुरवात मलंगवाडी (ता. बदलापूर जि. ठाणे) येथून झाली. पाचपीरमार्गे पीरमाची गाठत पुढे खड्या चढाईच्या मार्गाने सोनमाची येथे जाता येते. येथून उजव्या बाजूला खडक आणि डाव्या बाजूला दरी अशा मार्गाने पुढे गेल्यावर खडकात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेने 70 फूट वर गेल्यावर हा मार्गच नाहीसा होतो.
याठिकाणी 15 फूटी पोल क्रॉसिंगचा थरार अनुभवत मार्ग काढण्यात आला. पुढे दोन्ही बाजूला दरी आणि छोट्या निसरड्या वाटेने मार्ग काढत राजवाडा आणि पाण्याचे टाके असलेला गडमाथा गाठत गिर्यारोहकांनी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकावत वीर भगतसिंग यांना मानवंदना दिली. पोल क्रॉसिंग आणि साखळदंड मार्ग, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे, धुक्यात हरवलेला परिसर, निसरड्या पायऱ्या आणि एका बाजूला खोल दरी, घनदाट जंगल अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.
सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर्सच्या चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, सौरभ भगत, हर्षल पाटील, जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव आणि लोणंद येथील पूजा टाक, कमलसिंग क्षत्रिय तसेच राजगुरूनगरचे गिर्यारोहक डॉ. समीर भिसे, प्रमोद अहिरे, प्रदीप बारी, नाशिक येथील भारतीय महिला कबड्डी संघाच्या माजी प्रशिक्षक शैलजा जैन, मुंबई येथील डॉ. एकता राऊत, डॉ. अर्जुन सावंत, डॉ. राहुल जाधव या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित मोहीम फत्ते केली.