नवी दिल्ली – एकीकडे करोनावरील लसीकरणाचे काम चालू असताना दुसरीकडे करोनाचे नवे रुग्ण वाढत असल्यामुळे विविध बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. सोन्याच्या दरातही काल घट झाल्यानंतर आज गुरुवारी वाढ झाली.
दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचे दर 385 रुपयांनी वाढून 49,624 प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 1,102 रुपयांनी वाढून 66,954 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,878 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.80 डॉलर प्रति औंस झाले.
सोन्याच्या वाढलेल्या दराबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असतानाच डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढले असल्याचे दिसून आले.
दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील नव्या स्वरूपाच्या करोनाचा जागतिक मनुष्यबळावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याकडे गुंतवणूकदारांचे आगामी काळात बारिक लक्ष असणार आहे. त्यामुळे काही काळ तरी सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली गेल्यास खरेदी केल्यानंतर गुंतवणूकदारांना दीर्घ पल्ल्यात त्याचा फायदा होऊ शकतो, असे काही विश्लेषक सुचवीत आहेत.