मोहाली -सलामीवीर शुभमन गिलने फटकावलेले धडाकेबाज अर्धशतक तर वृद्धिमान साहा, डेव्हीड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी केलेली उपयुक्त फलंदाजी यांच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने धडाक्यात सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिल व वृद्धिमान साहा यांनी आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने 48 धावांची सलामी दिली. साहा 19 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा करून बाद झाला.
त्यानंतर गिलने साई सुदर्शनच्या साथीत संघाचे अर्धशतक फटकावर लावले व डाव सावरला. सुदर्शन 20 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावांवर परतला. यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार हार्दिक पंड्याने गिलसह संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, पंड्याने पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 11 चेंडूत 1 चौकार फटकावताना 8 धावा केल्या. दरम्यान, गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. पंड्या बाद झाल्यावर डेव्हीड मिलर फलंदाजीला आला व त्याने गिलला सुरेख साथ दिली. या जोडीने संघाचे दीडशतकही फलकावर लावताना पंजाबच्या गोलंदाजांवर दडपण आणले. गिल सुरेख फलंदाजी करत असतानाच अचानक बाद झाला. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावताना 67 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर राहुल तेवतिया फलंदाजीला आला. एका बाजूने मिलर संघाचा विजय जवळ आणत होता.
या जोडीने कोणतेही दडपण न घेता संघाचा विजय साकार केला. अखेरच्या षटकांत गुजरातला विजयासाठी 7 धावांची गरज होती. या षटकात पहिल्या चेंडूवर मिलरने एख धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर गिल बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली तर चौथ्या चेंडूवर मिलरने एक धाव घेत पुन्हा तेवतियाला फलंदाजीची संधी दिली. या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर तेवतियाने चौकार फटकावला व गुजरातचा विजय साकार केला. मिलर 18 चेंडूत एका चौकारासह 17 धावांवर तर तेवतिया 2 चेंडूत 1 चौकार फटकावताना 5 धांवर नाबाद राहिला. पंजाबकडून हरप्रीत ब्रार, सॅम कुरेन, अर्शदीप सिंग व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, मधल्या फळीतील फलंदाजांनी उपयुक्त फलंदाजी केल्यामुळे आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्जला 20 षटकांत 8 बाद 153 अशी मजल मारता आली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. पंजाबच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरनसिंग डावातील पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. पाठोपाठ भरात असलेला कर्णधार शिखर धवननेही निराशा केली. 2 बाद 28 अशा स्थितीतून मॅथ्यु शॉर्टने भानुका राजपक्षेसह डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. 24 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करत शॉर्ट परतला. त्याच्याजागी आलेल्या जीतेश शर्माने 23 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर सॅम कुरेनच्या साथीत राजपक्षेने संघाचे शतक फलकावर लावले. राजपक्षे स्थिरावल्यावरही अनावश्यक पद्धतीने फटका मारून 20 धावांवर बाद झाला. त्याने 26 चेंडूत 1 चौकार फटकावत एका बाजूने संयमी खेळी केली.
कुरेनने शाहरुख खानसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अती आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो 22 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 22 धावांवर परतला. शाहरुख खानही 22 धावांवर धावबाद झाला. त्याने या खेळीत 9 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावले. मात्र, त्यापूर्वी त्याने हरप्रीत ब्रारसह संघाला दीडशतकी मजल मारून दिली. ब्रार 8 धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून मोहित शर्माने 4 षटकांत केवळ 18 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. रशीद खान, जोशुआ लिटील, अल्झारी जोसेफ व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पंजाबचा डाव 20 षटकांत 8 बाद 153 असा रोखला गेला.
लक्षवेधी
पंजाबचा धवन
साफ अपयशी
मधल्या फळीतील फलंदाजांमुळे
पंजाब सावरला
दीडशतकी धावांपर्यंत मारली मजल
गुजरातकडून मोहित शर्माची भेदक गोलंदाजी
त्याच्या 4 षटकांत
18 धावांत 2 बळी
गुजरातचा यशस्वी पाठलाग
गिलची धडाकेबाज अर्धशतकी खेळी
वृद्धिमान साहाची
उपयुक्त खेळी
मिलर व तेवतियाकडून विजय साकार
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 8 बाद 153 धावा. (मॅथ्यु शॉर्ट 36, जीतेश शर्मा 25, सॅम कुरेन 22, शाहरुख खान 22, भानुका राजपक्षे 20, मोहित शर्मा 2-18, रशीद खान 1-26, जोशुआ लिटील 1-31, अल्झारी जोसेफ 1-32, महंमद शमी 1-44). गुजरात टायटन्स – 19.5 षटकांत 4 बाद 154 धावा. (शुभमन गिल 67, वृद्धिमान साहा 30, साई सुदर्शन 19, डेव्हीड मिलर नाबाद 17, राहुल तेवतिया नाबाद 5, हरप्रीत ब्रार 1-20, सॅम कुरेन 1-25, अर्शदीप सिंग 1-33, कागिसो रबाडा 1-36 ).