नगर – कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे बुऱ्हाणनगर येथील पुरातन मंदिरात रविवारी सकाळी महापूजा, अभिषेक करून दुपारी 12 वाजता आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदो उदो…अशा जयघोषात विविधीत घटस्थापना झाली. यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी डोक्यावर घट घेवून मंदिर परिसराला वाजतगाजत प्रदक्षिणा मारली. पारंपरिक वेशभूषा व तुतारी, संभळ या वाद्याने शोभयात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेनंतर मंदिराचे मुख्य पुजारी ऍड.विजय भगत व ऍड.अभिषेक भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढवण्यात आली आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत. या वर्षांपासून देवीच्या मुखदर्शनाचीही सोय करण्यात आली असून भाविकांना मंदिरातूनच देवीचे मुखदर्शन करता येणार आहे.
केवळ गाभाऱ्याची स्वच्छता व मंदिराच्या साफसफाईसाठी मंदिर काहीवेळ बंद असणार असून भाविकांना 21 तास देवीचे दर्शन करता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पुढील 10 दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी ऍड.अभिषेक भगत यांनी दिली.