मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना वारंवार टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला होता. दसरा मेळाव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान ठाकरे यांनी, महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, आतापासूनच तयारीला लागा असे आदेश दिल्याचे समजते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने केलेली कामे सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असेही आदेश दिले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावर तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे कौतुक केले. तत्पूर्वी, दसरा मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर वारंवार टीकास्त्र डागणाऱ्या भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल, कंगना रानौत, अर्णब गोस्वामी यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप नेत्यांनी आक्षेप नोंदवत त्यांची भाषा मुख्यमंत्री पदाला साजेशी नसल्याचं म्हंटलं होत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण करण्यात आली.