पुढील आठवड्यात पुन्हा गॅस दरवाढ शक्‍य

नवी दिल्ली – जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढत असल्यामुळे पुढील आठवड्यात भारतात स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या गॅसची खरेदी आणि विक्रीच्या किमतीत शंभर रुपयाची तफावत आहे.

जर सरकारने गॅसच्या दरवाढीला परवानगी दिली तर पुढील आठवड्यात गॅसची दरवाढ होऊ शकेल असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. या अगोदर 6 ऑक्‍टोबर रोजी गॅसच्या दरामध्ये 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलै महिन्यापासून हा दर 90 रुपयांनी वाढला आहे. गेल्या काही आठवड्यापासून जागतिक बाजारात गॅसच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे कंपन्यांना प्रत्येक सिलेंडर मागे 100 रुपयांचा तोटा होत आहे.

सरकार याबाबत अनुदान देत नाही. त्यामुळे आम्हाला गॅसची दरवाढ करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. जर गॅसचे दर वाढवायचे नसतील तर सरकारला त्या प्रमाणात अनुदान द्यावे लागेल असे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

गेल्या वर्षापासून सरकार गॅसच्या खरेदी आणि विक्री किमतीतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान सध्या गॅसचे दर उच्च पातळीवर असल्यामुळे विविध राज्यात या दरवाढीविरोधात नागरिक निदर्शने करीत आहेत.

पुन्हा जर गॅसच्या किंमतीमध्ये वाढ केली तर नागरिक अस्वस्थ होण्याची शक्‍यता आहे. त्यातच काही राज्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळेही या गॅसचे दर कमी ठेवण्यासाठी सरकार मर्यादित काळासाठी तरी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.