येरवडा, दि. 17 (प्रतिनिधी) -येरवडा येथील प्रभाग क्रमांक 6 मध्ये काही दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने कचऱ्याचे ढीग साचल्याचे वारंवार सांगूनही ते उचलले नाहीत त्यामुळे माजी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांच्या दालनातील टेबलवर कचरा आणून टाकला. या घटनेबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार करणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी वैभव कडलख यांनी सांगितले.
येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या येरवडा प्रभाग क्रमांक 6 मध्ये बहुतांश झोपडपट्टीचा भाग येतो. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याची समस्या नेहमीच प्रकर्षाने जाणवते. सलग आलेल्या सुट्टयांमुळे प्रभागात साचलेला कचरा मागील तीन दिवसांपासून उचलला गेला नसल्याने तो त्वरीत उचलावा यासाठी माजी नगरसेवकांनी आग्रह धरला होता.
मात्र, कचरा वाहून नेणारी वाहने उपलब्ध नसल्याने कचरा उचलला गेला नाही. यावरून माजी नगरसेवक आणि त्यांच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी कचरा थेट सहायक आयुक्तांच्या टेबलावर कचरा टाकला. मात्र, तत्पूर्वी प्रभागातील कचरा बुधवारी कोणत्याही परिस्थितीत उचलण्याचे आश्वासन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डमाळे यांनी त्यांना फोनवरून दिले असल्याचे सांगितले.
आज सकाळी अकरा वाजता क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रगीत कार्यक्रम तसेच मतदार कार्डला आधार कार्ड जोडणीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्वांना प्रभागातील स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सलग सुट्टयांमुळे कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. मात्र, तो आजच साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, असे असूनही हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे.
– वैभव कडलख, सहायक आयुक्त,
येरवडा क्षेत्रीय कार्यालय