पुणे – जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये आकर्षक असे कोरीवकाम, खोदकाम सुद्धा केलेले आहे.
अष्टविनायक गणपतींपैकी लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा सहावा गणपती असून, जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. मुंबई पासून तब्बल १८० कि.मी आहे.
गणपतीच्या मंदिरात येण्यासाठी तब्बल ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून डोंगर खोदून तयार केले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात ही गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात.
हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख ‘जीर्णापूर’ व ‘लेखन पर्वत’ असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे. त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे. म्हणून याला “लेण्याद्री’ असे नाव पडले.
गिरिजात्मज गणपतीची आख्यायिका –
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नाव मिळाले.
लेण्याद्रीपासून इतर अष्टविनायकांचे अंतर –
ओझर १७ कि.मी, रांजणगाव १२० कि.मी, मोरगाव १५५ कि.मी, थेऊर १३२ कि.मी, सिद्धटेक १८० कि.मी, महड १३५ कि.मी, पाली १७५ कि.मी