पुणे – विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंला शासकीय नोकरीत आरक्षण मिळते. याचाच गैरफायदा घेत काही ठगांनी गैरव्यवहार करत खेळात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. त्याचा उपयोग करत सरकारी नोकरीही मिळवली. अखेर या भामट्यांचा “खेळ’ चव्हाट्यावर आला असून, अशा 109 बोगस प्रमाणपत्र धारकांची नावे राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने शनिवारी जाहीर केली आहेत. यापैकी 17 उमेदवारांची शासकीय नोकरी रद्द करण्याची शिफारसही क्रीडा विभागाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या भामट्यांनी गृह विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास, राज्यकर, विधी व न्याय, वित्त विभाग, जलसंपदा, महसूल व वन अशा विविध विभागांतील पदांवर नोकऱ्या बळकावल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पॉवरलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, कयाकिंग, कनोईंग, तलवारबाजी, ट्रम्पोलिन अशा खेळांतील खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.
बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत समोर आले होते. त्यामुळे क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला. काही महिन्यांपूर्वी क्रीडा प्रमाणपत्रासंदर्भात समर्पण योजनाही सादर करण्यात आली होती. त्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पित करणाऱ्यांच्या नावाची गोपनीयता बाळगून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
शिक्षक अन् तलाठीही बोगस
पोलीस शिपाई, टंकलेखक, कृषी सहायक, कृषिसेवक, शिक्षण सेवक, गटशिक्षणाधिकारी, तलाठी अशा पदांवरील 17 उमेदवारांची शासकीय सेवा रद्द करण्याची शिफारसही क्रीडा विभागाकडून करण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांची नोकरी आता धोक्यात आली आहे.