ह्युस्टन – पोलिसांच्या क्रौर्यामुळे मरण पावलेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णिय व्यक्तीवर मंगळवारी शेकडो व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मिनियापोलिसामध्ये 25 मे रोजी एका पोलिसाने गुडघ्याने फ्लॉईडची मान जमिनीवर दाबून धरली होती. त्यामुळे गुदमरून फ्लॉईड याचा मृत्यू झाला होता.
फ्लॉईड यांच्या मृत्यूमुळे केवळ अमेरिकेतच नव्हे, तर अनेक देशांमधील पोलिसांच्या अत्याचार आणि वंशभेदाविरोधात प्रचंड आंदोलन उभे राहिले आहे. या आंदोलनात शेकडो इमारतींची नासधूस आणि जाळपोळ झाली. ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी आदी देशांमध्येही उग्र निदर्शने सुरू आहेत. कित्येक ठिकाणी राजेशाही, सरंजामशाही आणि वसाहतवादाची प्रतिके असलेले पुतळे आणि स्मारकांवर ग्राफिटी रंगवून वंशभेदाचा धिक्कार करण्यात आला. तर सरकारी वाहने आणि कार्यालयांना आगीही लावण्यात आल्या होत्या.
फ्लॉईडचा मृत्यू जरी 25 मे रोजी झाला तरी कोविड-19 च्या साथीमुळे अंत्यसंस्कारांसाठी त्याचा मृतदेह शनिवारी ह्युस्टन इथे आणण्यात आला. घोड्यांच्या बग्गीतून फ्लॉईडची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याचे पार्थिव सुवर्ण शवपेटीत ठेवले गेले होते. दफनभूमीमध्ये फ्लॉईडच्या आईच्या थडग्याशेजारीच फ्लॉईडला दफन केले गेले.
फ्लॉईडच्या अंत्यविधीसाठी कडक उन्हातही शेकडोजण उपस्थित राहिले होते. फ्लॉईडच्या एका भावाने या प्रसंगी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले आणि आपल्या भावाला “सुपर मॅन’ असे संबोधले.
नॉर्थ कॅरोलिनातील रेफोल्ड, ह्युस्टन आणि मिनियापोलिस या तीन शहरांमध्ये फ्लॉईडच्या निधनाबद्दल सहा दिवसांचा दुखवटा जाहीर केला गेला आहे. रेफोल्डमध्ये फ्लॉईडचा जन्म झाला होता. ह्युस्टनमध्ये तो मोठा झाला आणि मिनियापोलिसमध्ये त्याचा अंत झाला. एक पिता, बंधू, भाचा, धावपटू, मार्गदर्शक, मित्र आणि परिवर्तनासाठीचा उत्प्रेरक म्हणून फ्लॉईड कायमच स्मरणात राहिल अशा भावना यावेळी व्यक्त केल्या गेल्या. फ्लॉईड पूर्वी चोरीच्या आरोपाखाली 5 वर्षे तुरुंगात होता. मात्र नंतर तो सुधारला आणि चर्चच्या माध्यमातून सेवा करायला लागला होता.
फ्लॉईडची कन्या गियाना हिला टेक्सास साऊदर्न युनिव्हर्सिटीने पूर्ण शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली आहे.
सेलिब्रिटींचीही हजेरी …
फ्लॉईडच्या अंत्यविधीच्यावेळी जेमी फॉक्स, चॅन्निंग टाटन, जेजे वॅट हे कलाकार, गायक ट्रे था ट्रूथ, लोकप्रतिनिधी शीला जॅक्सन ली, ह्युस्टनचे पोलीस प्रमुख आर्ट ऍक्वेडो आणि ह्युस्टनचे मेयर सिल्वेस्टर टर्नर हे उपस्थित होते. पोलिसांनी आपल्या कारवाईदरम्यान कोणी गुदमरणार नाही, अशाप्रकारे पकडता कामा नये, असे कृती आदेश टर्नर यांनी या प्रसंगी दिले. अध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गेल्या फ्लॉईडच्या कुटुंबियांची सोमवारी भेट घेतली मात्र ते अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नाहीत.