पेशावर – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतात जमावाच्या हल्ल्यात हिंदु मंदिराची मोठी मोडतोड झाली होती. त्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी प्रांतिक सरकारने 3 कोटी 48 लाख रूपयांचा निधी मंजुर केला आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्थानिक मौलवींच्या चिथावणीने इस्लामिक कट्टरपंथीयांनी या मंदिराची मोडतोड केली होती.
हे मंदिर म्हणजे श्री परमहंसजी महाराजांचे समाधी मंदिर होते. ते करक जिल्ह्यातील टेर्री गावात आहे. ते किमान शंभर वर्षांचे जुने मंदिर आहे असे मानले जाते. या मंदिराची मोडतोड करण्यात आल्यानंतर तेथील हिंदु अल्पसंख्याकांनी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रांतिक सरकारला या मंदिराची पुनर्रंबांधणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रांतिक सरकारने हा निधी मंजुर केला आहे. दरम्यान या वादात स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकीत मंदिर पाडण्याच्या प्रकरणातील आरोपींनी माफी मागितल्यानंतर हिंदुंनीही या आरोपींना माफ केले आहे. या मंदिर प्रकरणात भारत सरकारनेही पाकिस्तानकडे निषेध नोंदवला होता.