कराड -जगभरात करोनाचा हाहाकार… देशात राज्यात करोनाची दहशत आणि प्रशासनाची तारांबळ… करोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची धडपड… याला आव्हान देण्याचेच काम कराड नगरपालिकेत झाल्याचे शनिवारी दिसून आले. कराड पालिकेच्या आवारात मुख्याधिकारी यशंवत डांगे यांचा वाढदिवस मोठ्या जोशात आणि शेकडोंच्या गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियमाच्या आदेशाला अक्षरशः हरताळ फासण्यात आला. ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे नागरिकांना उपदेशाचे डोस देणाऱ्या अधिकाऱ्यांना एक न्याय आणि सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय, अशी प्रशासनाची दुटप्पी भूमिका दिसून आली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग करोनाच्या लढ्यात अहोरात्र काम करत आहेत. यात जिह्यातील सर्व प्रांताधिकारी त्या-त्या विभागाचे नेतृत्व करत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस आपली सेवा बजावत आहेत.
यादरम्यान, नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासनाच्या सूचनेनुसार वेळोवेळी आपले आदेश दिले आहेत. यात मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळे पुजाअर्चासाठी बंद आहेत, लग्न कार्य, अंत्यविधी व त्यासंबंधीच्या विधी, वाढदिवस, राजकीय सभा, समारंभ आदी कार्यकमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल आणि करोनाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करताना अनेक कार्यक्रमांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. दरम्यान, कराडचे नागरिक, पालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यांनी करोनाशी दिलेल्या लढ्याला चांगले यश आले आहे. सध्या कराड शहरात एकही करोनाबाधित रूग्ण नाही. याच पार्श्वभूमीवर मीच माझा रक्षक ही बारा कलमी संकल्पना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्याधिकारी यांनी घेतला. मात्र, कालपर्यंतचे करोना वॉरियर्स उद्याचे करोना निमंत्रक बनल्याचे शनिवारी पहायला मिळाले.
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा दि. 5 जून रोजी वाढदिवस होता. यादिवशी ते उपलब्ध नसल्याने त्यांचा वाढदिवस शनिवार दि. 6 रोजी पालिकेच्या आवारात शेकडो कर्मचारी व अधिकारी तसेच काही मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीत हॉलमध्ये मोठ्या जोमात साजरा झाला. पालिका आवारात वाढदिवस साजरा करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा सर्वानांच विसर पडल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. अनेकांच्या तोंडाला मास्क असूनही तो लावला नव्हता.
वाढदिवस पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. तर याची सोशल माध्यमावरही चर्चा होती. मुख्याधिकारी यांचा वाढदिवस कर्मचारी यांनी साजरा करणे यात काही गैर नाही. परंतु, सर्व नियमांचे पालन करून केला असता तर त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा आहे.
कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडची चर्चा
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पालिका कर्मचारी व मुख्याधिकारी यांच्यातील णाणुबंध कराडकरांना पहायला मिळाले. वाढदिवसाचे औचित्य साधत पालिका कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोडमध्ये पालिकेत हजेरी लावली. नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस व काळा गॉगल असा पेहराव त्यांनी केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड कराड शहर वासियांसाठी कमालीचे आकर्षण ठरला. अशा पध्दतीने एखाद्या मुख्याधिकारी यांचा वाढदिवस साजरा करण्याची कराड पालिकेतील ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा शहरात होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध आदेश पारित केले आहेत. यामध्ये लग्न, मयत, अंत्यविधी, वाढदिवस, सभा, समारंभ आदी कार्यक्रमांवर बंदी आहे. काही अटीशर्तीवर प्रशासनाची परवानगी घेऊन अशा कार्यक्रमात संचारबंदी कायदा व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. असे असतानाही कराड पालिकेत अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पालिका आवारात मुख्याधिकारी डांगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याविषयी जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे कराडकरांचे लक्ष लागून आहे.
कराड पालिकेच्या आवारात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा वाढदिवस साजरा झाला. या विषयीची चर्चा सोशल माध्यमावर आहे. याची अधिकृत माहिती घेणार आहे.
रोहिणी शिंदे
नगराध्यक्षा, कराड
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांचे आहेत. वाढदिवस, लग्न, अंत्यविधी आदी कार्यक्रमांसाठी अटीशर्तीच्या अधीन राहून परवानगी आहे. मात्र, कराड पालिकेत या नियमाचे उल्लंघन करून पालिका आवारात वाढदिवस साजरे करणे योग्य नाही.
विनायक पावसकर
नगरसेवक कराड