बारामती – शहरातील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती “करोना’मुक्त झाले असून पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालयातून त्यांना शुक्रवारी (दि. 24) घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शहरातील सात करोना संक्रमित रुग्णांपैकी एका ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील पहिला करोना संक्रमित ठरलेला रिक्षा चालक यापूर्वीच करोना मुक्त झाला असून आत शुक्रवारी चौघांना घरी सोडण्यात येणार असल्याने आता शहरात एकच संक्रमित रुग्ण असून त्याच्यावर पुणे येथील औंध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात केवळ एकच रुग्ण उरल्याने बारामती शहर करोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहरात अवलंबण्यात आलेला भिलवाडा तसेच बारामती पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे.
बारामती शहरातील श्रमिक नगर येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर समर्थ नगर येथे पाच तसेच म्हाडा कॉलनी येथे एक रुग्ण सापडला त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या सात एवढी झाली होती. मात्र भिलवाडा तसेच बारामती पॅटर्ननुसार बारामती शहर सीलबंद करण्यात आले. नागरिकांना घरपोच अत्यावश्यक जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या त्यामुळे बारामती शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली राहिली.
शहरातील पाच जण आता “करोना’मुक्त झाले असून ही बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी बारामतीकरांनी हुरळून न जाता भिलवाडा व बारामती पॅटर्ननुसार घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.