पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत व्हिडीओ कॉन्फरसिंगवरून होत असलेल्या सुनावणींचा वकिलांना फायदा होता आहे. नुकताच एका प्रकरणात पुण्यातून ऍड. सचिन ठोंबरे यांनी बारामती येथील सत्र न्यायालयात खूनाच्या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी ऑनलाईन युक्तीवाद केला. लवकरच या सुनावणीवर निकाल होणार आहे. ऑनलाईन सुनावणी वकिलांसाठी वरदान ठरत आहे.
सुभाष तुकाराम ढवळे (वय 61, रा. खानोटा, ता.दौंड) यांनी ऍड. ठोंबरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्यासह अन्य तीन आरोपी या प्रकरणात आहेत. जमिनीच्या वादातून नामदेव गोपाळा ढवळे (वय 77) यांचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुभाष यांना 15 मार्च रोजी दौंड पोलिसांनी अटक केली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जामिनाबाबत लॉक़डाऊन होण्यापूर्वी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता.
याविषयी ऍड. सचिन ठोंबरे म्हणाले, लॉकडाऊनच्या दिवशी ई-मेल केला. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुण्यात सगळीकडे संचारबंदी आहे. मी स्वत: बारामती न्यायालयात येऊ शकत नाही. या प्रकरणात अर्जन्सी असून, मी युक्तीवाद करायला तयार आहे. त्या ई-मेलला उत्तर आले. तुमचा म्हणणे मान्य करण्यात आले आहे, असे त्या ई-मेलमध्ये सांगितले होते. एक लिंक पाठवली.
त्यामध्ये गेलो. सर्व डिटेल्स दिले. क्लार्कला ते कनेक्ट होते. क्लार्क व्हेरिफाय करतो. तो वेळेनुसार तो न्यायाधीशाकडे देतो. त्यावरून न्यायाधीश युक्तीवाद ऐकतात. 302 प्रकरणात जामिनासाठी ऑनलाई युक्तीवाद केला. सुभाष यांचा खून करण्याचा हेतू नसून, ते महिन्याहून अधिक काळापासून तुरूंगात आहेत. त्याच्या वयाचा आणि इतर बाबीचा विचार करून जामीन देण्याची मागणी केली.