BJP MLA Rajendra Patni passed away वाशिम – भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते 2003 पर्यंत विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
2004 ते 2009 पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदारसंघात विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत २०११ मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र 2014च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले.
त्यावेळी भाजपकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. ते निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये ते पुन्हा कारंजा मतदारसंघात भाजप आमदार म्हणून निवडून गेले. करोना काळात त्यांना दोनदा करोना झाला होता. त्याचदरम्यान किडनी विकाराने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर झाल्याचे निदान झाले.
गेल्या काही महिन्यापासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई येथे उपचार घेत होते. आज सकाळी नउच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीयासह भाजपला मोठा धक्का बसला आहे.
याही बातम्या वाचा –
कट्टर शिवसैनिक, नगरसेवक ते मुख्यमंत्री ! मनोहर जोशींचा थक्क करणारा राजकीय प्रवास
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला ! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन