पॅरिस – जर्मनीचा अव्वल टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेव याने यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत आपले वर्चस्व कायम राखताना चौथ्या फेरीचा अडसर दूर केला. त्याने या फेरीतील सामन्यात जपानच्या केई निशिकोरा याच्यावर 6-4, 6-1, 6-1 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली.
तत्पूर्वी, अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या 24 व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. सेरेनाला महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या एलिना रिबॅकिनाने सेरेनाला 6-3, 7-5 असे सहज पराभूत केले. 2017 सालापासून सेरेनाला एकाही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
सेरेनाव्यतिरिक्त व्हिक्टोरिया अझारेंका आणि मार्केता वोंद्रोशोव्हा यांचेही आव्हान संपुष्टात आले. अनास्तासिया पावल्यूचेन्कोव्हाने अझारेंकाला 5-7, 6-3, 6-2 असे पराभूत करत तब्बल 10 वर्षांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. पॉला बॅडोसाने वोंद्रोशोव्हाला 6-4, 3-6, 6-2 असे पराभूत केले. तमारा झिदानसेकने सोरोना क्रिस्टियावर 7-6 (7-4), 6-1 अशी मात केली.
रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि ग्रीकचा स्टीफानोस त्सित्सिपास यांनी उपांत्य फेरी गाठली.
आता उपांत्यपूर्व लढतीत दोघेही अंतिम फेरी गाठण्यासाठी कडवी लढत देतील. मेदवेदेवने चिलीच्या ख्रिस्तियन गॅरिनला 6-2, 6-1, 7-5 असे सरळ तीन सेटमध्ये नमवले. त्सित्सिपासने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टावर 6-3, 6-2, 7-5 असे वर्चस्व गाजवले.
बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन सहकारी फ्रॅंको स्कूगोरने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्केकेले. नेदरलॅण्डसचा मॅथ्यू मिडलकूपच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मार्सेलो अवरहेलच्या साथीने खेळणाऱ्या या जोडीने उपउपांत्यपूर्व सामन्यासाठी कोर्टवर न उतरण्याचे ठरवले. त्यामुळे बोपण्णा-स्कूगोरला पुढे चाल देण्यात आली.