मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शिवसेनेने एक खास व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर जारी केला. या व्हिडिओमध्ये 100 दिवसांत सरकारने काय केले हे अवघ्या 111 सेकंदात दाखविण्यात आले आहे. सरकारने घेतलेले वेगवेगळे निर्णय यांचा धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. इंग्रजीमध्ये हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारचे १०० दिवस फक्त १११ सेकंदमध्ये पाहा!
CM Uddhav Balasaheb Thackeray’s 100 days in 111 seconds!
Watch?? pic.twitter.com/tvdKS4xpKM
— Shivsena Communication (@ShivsenaComms) March 7, 2020
राज्यात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकारला 100 दिवस पूर्ण होताहेत म्हणूनच उद्धव ठाकरे सहकुटूंब शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे.
सोशल मीडियावर आपल्या सरकारच्या निर्णयांचा आणि धोरणांचा प्रचार करण्याचे काम शिवसेनेकडून सातत्याने केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी हा व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओमध्ये शेतकरी कर्जमाफी, भूमीपुत्रांसाठी घेतलेले निर्णय, औरंगाबाद विमानतळाला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव इत्यादी निर्णयाचा धावता आढावा घेण्यात आला आहे. आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढे 15 ते 20 वर्षे आम्हीच सत्तेत राहू असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.