संयुक्तराष्ट्रे – अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानी राजवटीच्या संबंधात अमेरिका, चीन, रशिया आणि पाकिस्तान या चार देशांनी एकत्र येऊन काम करण्याचे योजले आहे. तालिबानी राजवटीकडून दहशतवाद माजवला जाणार नाही, त्यांच्याकडून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता होईल याकडे हे चार देश परस्पर समन्वयाने लक्ष ठेवणार आहेत. रशियाचे विदेश मंत्री सर्जी लाव्हरोव यांनी ही माहिती दिली.
या चार देशांचे प्रतिनिधी कतारची राजधानी दोहा येथे जमून परस्परांमध्ये चर्चा करणार आहे. त्यानंतर हे प्रतिनिधी थेट काबुल मध्ये जाऊन तालिबान सरकारचे प्रतिनिधी आणि अफगाणिस्तानातील अन्य सेक्युलर गटांचे प्रतिनिधी यांची भेट घेणार आहे असेही लाव्हरोव यांनी म्हटले आहे.
तालिबानने इस्लामीक तत्वांचे पण सुधारणावादी मॉडरेट स्वरूपचे सरकार देण्याचे आश्वासन जगाला दिले आहे. तसेच आमच्या सरकारचा कारभार सर्वसमावेशक असेल अशीही ग्वाही दिली आहे. त्या धोरणावरच हे सरकार चालत आहे की नाही याची पहाणीही हे चार देश करणार आहेत.