सातारा – साताऱ्यातील संदीप विष्णू संकपाळ (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने ऑगस्ट महिन्यात दाखल केली होती. पती बेपत्ता झाला असून त्याचा मोबाइलही लागत नसल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले होते. बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे आव्हान सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांपुढे होते. मात्र, गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करत या बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे उघड केले असून याप्रकरणी सातारा तालुक्यातील तिघांसह पाडेगाव (ता. खंडाळा) येथील एक अशा चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून संदीपचा खून झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय अविनाश चव्हाण (वय 28, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे, ता. सातारा), शिवाजी नामदेव शिंदे (वय 43, रा. राजमुद्रा अपार्टमेंट, सैदापूर, ता. सातारा), विशाल शहाजी खावले (वय 21, रा. मतकर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) व सुमित अशोक भोसले (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी, पाडेगाव, ता. खंडाळा) या चौघांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप संकपाळ बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी जान्हवी संकपाळ यांनी दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. दि. 22 रोजी ही तक्रार दाखल करुन घेण्यात आली होती.
मात्र, मोबाइल लागत नसल्याने संबंधित व्यक्ती कोठे गेली आहे याबाबत तपास करण्याचे आव्हान सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर होते. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी चौकशी करत असताना संदीप संकपाळचा सैदापूर येथील मित्र शिवाजी शिंदे याने जान्हवी संकपाळ यांच्याकडे संदीप कोठे आहे, अशी विचारणा केली होती असे समजले. त्यामुळे पोलिसांनी शिवाजी शिंदे यांच्याकडे चौकशी केली. त्याने दिलेली माहिती संशय निर्माण करत होती. मात्र, शिवाजी शिंदे चाणाक्षपणे पोलिसांच्या चौकशीला येतच होता. त्यादरम्यान पोलीसांनी अत्यंत हुशारीने व कौशल्यपूर्ण आणखी माहिती घेतली असता काही धक्कादायक माहिती समोर आल्याने शिवाजी शिंदे याच्यावर संशय बळावला.
मग पोलिसांनी खाक्या दाखवत शिवाजी शिंदे याचे तपास केला असता त्याने कबुली दिली. त्यानुसार दि. 21 ऑगस्ट रोजी जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या कमिशन स्वरुपात दस्त झाल्यानंतर संदीप संकपाळ यास मोठी रक्कम मिळणार असल्याने शिवाजी शिंदे व त्याच्या तीन साथीदारांनी कट रचून संदीप संकपाळचे सातारा तहसीलदार कार्यालयाजवळून चारचाकी वाहनातून अपहरण करुन गाडीतच खून केला. त्याचदिवशी रात्री संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगावच्या हद्दीत फॉरेस्टचे दाट झाडीत पुरुन टाकून विल्हेवाट लावली.
त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवाजी शिंदेसह चौघांना अटक करत हा खून उघडकीस आणला. पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार किशोर जाधव, श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, निलेश जाधव, संतोष कचरे, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, मच्छिंद्र माने, सुशांत कदम, प्रकाश सोनवले, संतोष भोसले यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या कमिशन स्वरुपात दस्त झाल्यानंतर संदीप संकपाळ यास मोठी रक्कम मिळणार असल्याने शिवाजी शिंदे व त्याच्या तीन साथीदारांनी कट रचून संदीप संकपाळचे सातारा तहसीलदार कार्यालयाजवळून चारचाकी वाहनातून अपहरण करुन गाडीतच खून केला. त्याचदिवशी रात्री संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगावच्या हद्दीत फॉरेस्टचे दाट झाडीत पुरुन टाकून विल्हेवाट लावली.
त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवाजी शिंदेसह चौघांना अटक करत हा खून उघडकीस आणला. पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार किशोर जाधव, श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, निलेश जाधव, संतोष कचरे, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, मच्छिंद्र माने, सुशांत कदम, प्रकाश सोनवले, संतोष भोसले यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
सलग तीन दिवस तपास
बेपत्ता संदीप संकपाळ यांचा तपास करत असताना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुवे हाती लागत गेल्यानंतर सलग तीन दिवस संशयिताकडे तांत्रिक विश्लेषणासह अत्यंत चिकाटीने सलग तीन दिवसरात्र सातारा, महाबळेश्वर, पाडेगाव, लोणंद, कोंडवे, नीरा येथे जाऊन तपास केला. संशयित ताब्यात घेऊन अत्यंत क्लिष्ट व गुंतागुतीचा गुन्हा उघडकीस आणल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले.