पिंपरी, दि. 22 – फ्लिपकार्टच्या गोडाऊनमधून माल घेऊन तो ग्राहकांना पोहोच करण्याचे काम करणारे डिलिव्हरी बॉयच गोडाऊन मधून मोबाइल गायब करायचे. गोडाऊनमधून वस्तू गहाळ झाल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना न येता कंपनीला येत असे. हा प्रकार निदर्शनास आल्याने कंपनीकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी तपास करत चौघांना अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी येथील फ्लिपकार्ट कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडला.
सचिन संजय मोरे (वय 30, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी), राजू बिरेंद्रकुमार गुप्ता (वय 46, रा. भोईरवाडी, पुणे), ज्ञानदेव विजयकुमार ढवळे (वय 21, रा. डांगे चौक, वाकड), हर्ष केशव वर्मा (वय 24, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश ओमेनकुट्टन (वय 34, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मारुंजी येथे फ्लिपकार्ट कंपनीचे गोडाऊन आहे. त्यात आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. कंपनीकडून गोडाऊनमधील सर्व बाबींची दर तीन ते चार महिन्याला तपासणी केली जाते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या तपासणीमध्ये मारुंजी येथील गोडाऊन मधून मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन गहाळ असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीकडून हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
हिंजवडी पोलिसांनी तपास करून डिलिव्हरी बॉय असलेल्या चौघांना अटक केली. चौघांनी ऑगस्ट अखेर पासून ते नोव्हेंबर अखेर पर्यंत लाखो रुपयांचे मोबाइल फोन गोडाऊन मधूनच गहाळ केले. गोडाऊन मधून गहाळ झाल्याने ग्राहकांना त्याचा भुर्दंड बसला नाही. कंपनीच्या तपासणीमध्ये मोबाइल फोन मोठ्या प्रमाणात गहाळ होत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींकडून चार लाख 12 हजार 686 रुपये किमतीचे मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.