-->

कच्च्या माल महागल्याने फाउंड्री व्यवसाय अडचणीत

  • दरात सुमारे 40 ते 50 टक्के वाढ : हातात ऑर्डर असूनही काम करता येत नाही
  • शहरात सुमारे दोनशे फाउंड्री उद्योग : ऑटोमोबाइल क्षेत्रातील महत्त्वाचा घटक

पिंपरी – फाउंड्री उद्योगासाठी आवश्‍यक कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने राज्यातील 25 हजार फाउंड्री उद्योग अडचणीत सापडले आहेत. करोना काळानंतर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्याने उद्योगांची चाके पुन्हा सुरू झाली. अनेक उद्योगांना चांगल्या ऑर्डरही मिळाल्या आहेत; पण कच्च्या मालाचे दर वाढल्याने उद्योग क्षेत्र पुन्हा संकटात आले आहे.

लॉकडाऊननंतर देशभरात ट्रॅक्‍टरची मागणी वाढण्याबरोबर पॅसेंजर व्हेईकलसह कमर्शियल वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तीन- चार दिवसांपासून तर दिवसाला कच्च्या मालाची किंमत वाढते आहे. यात प्रामुख्याने पीग आयर्न, निकेल, स्टील, कॉपर याचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या तरी मोठ्या उद्योगांकडून जुन्या दरानेच पक्का माल घेतला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून, फाउंड्री उद्योग तोट्यात चालवावा लागत आहे.

करोना अनलॉक नंतर कच्च्या मालाच्या दरात सुमारे 40 ते 50 टक्के वाढ ही फौंड्री उद्योजकांना सोसावी लागत आहे. त्या तुलनेत कास्टिंगला दर वाढवून मिळत नाही. कच्च्या मालाचे बुकिंग करावयाचे असेल तर त्यासाठी पूर्ण रक्कम ऍडव्हान्समध्ये भरावी लागत आहे. त्यामुळे करोना संकटातून बाहेर पडलेला फाउंड्री उद्योग कच्चा मालाच्या वाढत्या किमतीने पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, रांजणगाव, मरकळ या विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे अडीच हजार फाउंड्री वउद्योग आहेत. तर पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील त्यांची संख्या 150 ते 200 च्या आसपास आहे. या सर्वच उद्योगांच्या अर्थकारणाला खीळ बसली आहे.

पिंपरी-चिंचवड एमआयडीसीचा पाया ऑटोमोबाईल सेक्‍टर असल्याने लॉकडाऊनमध्ये सहा महिने उद्योग बंद असतानादेखील आता याठिकाणचे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, नव्या दराने माल खरेदी करण्यास उद्योग नकरा देत आहेत; तर कच्च्या मालाचे संपूर्ण पैसे अदा केल्याशिवाय माल मिळत नाही. अशा दुहेरी आर्थिक अडचणीत हा उद्योग सापडला आहे.
जीवन लोंढे,
संचालक, अथर्व रसायन उद्योग, तळवडे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.