प्राथमिक शिक्षिका ते वरिष्ठ मुख्याध्यापक अशी महत्वाची जबाबदारी गेली 36 वर्षे पार पाडणाऱ्या सातारारोड पाडळी (ता. कोरेगाव) येथील सौ. कमल गणेश फाळके यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले. आज विविध क्षेत्रात हे विद्यार्थी चमकत आहेत. ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या फाळके मॅडम यांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
कोंडवे (ता. सातारा) येथील माहेरवाशिण असलेल्या कमल फाळके यांनी बी.ए. डी. एड शिक्षण पूर्ण केल्यानंतर जानेवारी 1985 मध्ये किडगाव (ता. सातारा) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवेस प्रारंभ केला. 18 वर्षे किडगाव येथे कार्यरत राहिल्याने फाळके मॅडम म्हणून त्यांची ओळख झाली होती. यादरम्यान अनेक विद्यार्थी घडवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. किडगाव येथील त्यांचे अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, पोलिस, शिक्षक, सीए अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. किडगाव येथून नागेवाडी शाळेत बदली झाल्यानंतर याठिकाणी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत त्यांनी शाळेस नावलौकिक मिळवून दिला. कोंडवे येथे स्वत:च्या माहेरात आठ वर्षे संधी मिळाली.
या संधीचे सोने करत जास्तीत जास्त वेळ ज्ञानार्जनासाठी देऊन कोंडवे शाळेची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी प्राथमिक शाळेतही त्यांनी आठ वर्षे सेवा केली. मोरावळे (ता. जावळी) येथे मुख्याध्यापक म्हणून त्यांची पदोन्नतीने बदली झाली. त्यानंतर आंबेदरे येथेही त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सात वर्षे सेवा केली. यादरम्यान सातारा पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन कमल फाळके यांचा गौरव झाला. करंजे तर्फ परळी येथेही त्यांनी सेवा बजावली. अतित येथे वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून सौ. फाळके यांनी काम केले. याच ठिकाणी 30 जून 2021 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या.
गेल्या 36 वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेत विविध उपक्रम राबवत कमल फाळके यांनी उठावदार काम केले. ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक कामातही त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. करोनाच्या संकटात विद्यार्थी, पालकांशी समन्वय साधत प्राथमिक शाळांचा नावलौकिक व दर्जा वाढवण्यावर त्यांनी भर दिला. अतित, कसबे बामणोली, कोंडवे, शाहूपुरी, एहसास मतिमंद शाळा आदींना आर्थिक स्वरुपाचे मदत देऊन त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेली 36 वर्षे सेवा करत असताना कुटुंबाकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले. फाळके मॅडम यांचे पती बॅंक फेडरेशन वडाळा येथे कार्यरत असून मुलगा इंजिनिअर तर मुलगी एमसीए झाली आहे. कुटुंबातील महिला शिक्षित असेल, कर्तबगार असेल तर काय घडू शकते हे कमल फाळके यांनी दाखवून दिले आहे.