मुंबई, दि. 22 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी त्यांच्या नव्या पदाचा आज पदभार स्वीकारला. गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून त्यांची नियुुक्ती करण्यात आली आहे. पण त्यांनी अजून त्या पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता.
आज त्यांनी दुपारी कार्यालयात जाऊन या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांची 17 मार्च रोजी या पदावर बदली करण्यात आली होती. त्याचे आदेश जारी झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना पत्रकारांनी त्यांना गाठून बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण पत्रकारांशी काहीही न बोलता ते निघून गेले.
त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मोठाच गदारोळ निर्माण केला आहे. गृहमंत्र्यांनी वाझे यांना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते या त्यांच्या आरोपावरून निर्माण झालेले वादळ अजून शमलेले नाही.