मुंबई – शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे शिंदे गटात प्रवेश केला. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दरम्यान त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला होता.
दीपक सावंत हे शिंदे गटाच्या मुख्यालयात बुधवारी दुपारी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडला. सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचे बोलले जात होते. यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाचा आणखी एक मोठा शिलेदार फुटल्याची भावना आहे.