सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सध्या टी-२० विश्वचषकामध्ये जबरदस्त लयीत खेळत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत २५ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या. यंदाच्या स्पर्धेत त्याने ५ सामन्यांमध्ये ३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावांची खेळी खेळली होती. तर नेदरलँड्सविरुद्ध सूर्याने नाबाद ५१ धावां केल्या होत्या. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात गुरुवारी टीम इंडिया आणि इंग्लंड आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन यांनी सूर्यकुमार यादवचे जोरदार कौतुक केले आहे.
“भाई उर्वशी बुला रही हैं…”, एका प्रेक्षकाने ऋषभ पंतला डिवचले अन्…
नासिर हुसैन यांनी म्हटले की, “सूर्यकुमार ( Suryakumar Yadav ) ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते त्याच्यासाठी देखील स्वप्नापेक्षा कमी नाही. सूर्यकुमारकडे एक विचित्र प्रतिभा आहे. तो 360 डिग्रीचा खेळाडू असून तो ऑफ-स्टंपच्या बाहेरचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी मारतो. त्याच्याकडे मनगटाच्या मदतीने उत्कृष्ट फटके खेळण्याची जबरदस्त कला आहे. याशिवाय, ‘व्हाइट बॉल प्लेअर’मध्ये आवश्यक असलेली सर्व प्रतिभा त्याच्याकडे आहे.”
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतो. त्यामुळे त्याने संघाच्या फलंदाजीची मधली फळी केवळ मजबूत केली नाही तर ती चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनीही सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा सेमीफायनल सामना इंग्लंडशी खेळला जाणार आहे. हा सामना १० नोव्हेंबरला गुरुवारी ऍडिलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ३ वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने २ तर इंग्लंडने एकदा बाजी मारलेली आहे. दोन्ही संघांमध्ये २०१२ साली शेवटचा टी-२० विश्वचषक सामना खेळला होता. ज्यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला होता.