सिडनी – ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू ऍशले मॅलेट यांचे वयाच्या 76व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूने शुक्रवारी मध्यरात्री ऍडलेडमध्ये अखेरचा श्वास घेतला.
मॅलेट यांनी 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 38 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी 1968मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि या संघाविरुद्ध 1980मध्ये कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली.
त्यांनी कसोटीत 29.84च्या सरासरीने 132 बळी घेतले. त्यांनी एकदा 10 विकेट्स, 6 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
मॅलेट यांची गणना जगातील सर्वोत्तम ऑफ-स्पिनर्समध्ये होते. 1972मध्ये पाकिस्तानविरुद्ध ऍडलेड कसोटीच्या एका डावात त्यांनी 59 धावांत 8 बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही स्पिनरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.