नवी दिल्ली – पाकिस्तान आणि इराणच्या सीमाभागात दहशतवाद्यांचे अनेक अड्डे आहेत. या दहशतवाद्यांना कोणा तिसर्या देशाचे सहाय्य मिळत असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन आमिर अब्देलहियान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलिल अब्बास जिलानी यांच्याबरोबरच्या चर्चेत म्हटले आहे. त्यांचा रोख पाकिस्तान तालिबानशी संबंधित असून अफगाणिस्तानमधील तालिबानशी संबंधित असलेल्या या दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानमधून सहकार्य मिळत असल्याचे अब्देलहियान यांनी सूचित केले आहे.
अब्दोलाहियन हे पाकिस्तानच्या भेटीवर असून जिलानी यांच्याशी त्यांची सखोल चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या हद्दींमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रे डागल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही चर्चा झाली. नूर खान हवाई तळावर अब्देलहियान यांचे काल रात्री उशीरा आगमन झाले आहे. आपल्या भेटीदरम्यान ते पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांचीही भेट घेणार आहेत.
इराणने पुंजगुरच्या पाकिस्तान सीमा भागात दहशतवाद्यांच्या कथित ठिकाणांना एकतर्फी लक्ष्य केल्यावर निर्माण झालेला तणाव दोन्ही देशांनी मिळून टाळला आहे. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे इराणने संयमाने टाळल्यामुळेच हा संघर्ष वाढला नाही.
मात्र तरिही इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या ९ मजूरांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. त्यामुळे हा तणाव नव्याने निर्माण होण्याची शक्यताही वाढली आहे.