विदेशरंग : पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे

– आरिफ शेख

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन विविध कारणांनी कायम चर्चेत असतात. 2036 पर्यंत सत्तेत राहण्याचा मार्ग त्यांनी घटनादुरुस्तीद्वारे नुकताच निर्धोक केला. शेजारील युक्रेन देशाला ते सीमावादातून धमकावत आहेत. आर्क्‍टिक प्रदेशात त्यांनी युद्धसरावाच्या नावाखाली घातक समुद्री हत्यार तैनात केले आहे. पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेला फुटलेल्या या धुमाऱ्याविषयी…

केजीबीचे गुप्तहेर ते रशियाचे पंतप्रधान, राष्ट्रपती व आता जवळपास तहहयात देशाचे सर्वेसर्वा राहण्यापर्यंतच पुतीन यांचा प्रवास वादळी व वादग्रस्त राहिलेला आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर त्यांनी रशियन जनतेला पुन्हा गतवैभवाची स्वप्ने दाखविली आहेत. जागतिक राजकारणात रशियाला त्यांनी दखलपात्र देश बनविला आहे. सत्तेची मांड पक्‍की होत असताना त्यांना पदाचा मोह सुटत नव्हता.

घटनादुरुस्ती करीत अध्यक्षांनी दोन पेक्षा अधिकवेळा पदभार सांभाळण्याची त्यांनी दोनदा तरतूद करवून घेतली. विरोधकांना तुरुंगात डांबून, खोटे गुन्हे नोंदवून, कधी अपात्र ठरवून, तर कधी रहस्यमय मृत्यू घडवून अथवा विषप्रयोगाने त्यांनी आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर केलेत.अलेक्‍सी नवालनी हे त्यांच्या दडपशाहीचे अलीकडचे उदाहरण. 1999ला बोरिस येल्त्सिन यांचे उत्तराधिकारी म्हणून ते पदावर आले.”गुरू से चेला सवाई’ या म्हणीप्रमाणे त्यांनी रशियन जनतेला आपल्या पोलादी व्यक्‍तिमत्वाची भुरळ घातली. कधी पंतप्रधान, तर कधी राष्ट्रपती होत त्यांनी सर्वसत्ता इच्छेप्रमाणे उपभोगली. घटनादुरुस्तीद्वारे त्यांनी 2036 पर्यंत (निवडणुकीद्वारे) पदावर राहण्याची तरतूद करून घेतली आहे. त्यांचे आजचे वय पाहता ते 83व्या वर्षांपर्यंत पदावर असू शकतात. लाइफ टाइम प्रेसिडेंट किंवा लोकशाहीच्या मुखवट्या आड दडलेला नवीन “झार’, अशी त्यांची खिल्ली विरोधकांद्वारा उडविली जात आहे.

केवळ सत्तेचा लोभ अन्‌ पदाची अभिलाषा एवढ्यावरच त्यांचे राजकारण थांबलेले नाही. जागतिक राजकारणात रशियाचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी त्यांनी आटापिटा चालविला आहे. असंख्य आरोपांचा सामना करूनही अन्‌ विरोधक रस्त्यावर उतरून देखील पुतीन यांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता राहिलेला आहे. नुकताच त्यांनी युक्रेनशी सीमावाद पुन्हा उकरून काढला. यातून पुतीन यांनी रशियन जनतेची सहानुभूती मिळवली. 2014 ला त्यांनी युक्रेन या देशाचा क्रिमिया हा भूभाग आमचा आहे म्हणत गिळंकृत केला. तेथे सार्वमत घेऊन जनमत रशियाच्या बाजूने असल्याचे दर्शविले. जगाने पुतीन यांची या बाबत केलेली निंदा व निर्बंध यांची त्यांनी तमा बाळगली नाही. अमेरिका व युरोपीय महासंघाने केलेला विरोध त्यांनी जुमानला नाही. आता पुन्हा ते युक्रेनच्या सीमेवर सैन्य जमवा जमवी करीत आहेत.

युक्रेनचा दोंनबोस्क नावाचा भूभाग हा आमचा असल्याच्या त्यांच्या दाव्याने खळबळ माजली आहे. क्रिमिया ताब्यात घेतला तेव्हा बायडेन हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. आता ते राष्ट्रपती असताना पुन्हा युक्रेनचा वाद समोर आला आहे.यंदा मात्र बायडेन यांनी रशियाला धमकी देत युक्रेनवर आगळीक केली तर सामना करू, असे म्हटले आहे. युक्रेन हा अमेरिका व युरोपीय महासंघाच्या संभाव्य मदतीवर आशावादी आहे. पुतीन यांनी युक्रेनला धमकी देताना जर त्याने वादग्रस्त प्रदेशात सैन्य तैनात केले तर बरबादी करण्याचा इशारा दिला आहे.

पुतीन यांच्या धमक्‍यांनी युरोपीय महासंघ चिंतेत आहे. युक्रेनचा पश्‍चिमी भाग हा युरोपीय महासंघाच्या निकट आहे. पूर्वेचा भाग हा रशियाच्या सीमेशी निगडित आहे. तीन बाल्टिक देश हे आधीच नाटो कराराचे सदस्य झाल्याने रशियाच्या तोंडाशी अमेरिकेचा धोका ओढवला होता.युक्रेन जर त्याच मार्गाने गेला तर रशियाच्या दारावर नवे संकट उभे राहील, याची भीती पुतीन यांना वाटत असावी. युक्रेनने युरोपीय महासंघाच्या नादी लागू नये, अन्‌ नाटोशी चार हात दूर राहावे, असे पुतीन यांना वाटणे स्वभाविक आहे.

युक्रेन आपल्या अंकित राहावा म्हणून त्यास ते धमकावत असावेत. पुतीन यांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे युक्रेनमध्ये रशियन धार्जिणे नागरिक काही कमी नाहीत. सांस्कृतिक, भाषिक अन्‌ धार्मिकदृष्ट्या त्यांच्यात खूप साम्य आहे. 2010 पर्यंत रशियाचे युक्रेनशी मधुर संबंध होते. मात्र युक्रेनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करून तेथे आपल्या पसंतीचे सरकार आणायचा प्रयत्न युरोपिय युनियनने केल्यावर रशिया खडबडून जागा झाला. त्या नंतरच दोन्ही देशांदरम्यानचे संबंध बिघडले. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

पुतीन यांनी आर्क्‍टिक प्रदेशाजवळ अमेरिकेसाठी नवी डोकेदुखी निर्माण केली आहे. या भागात रशिया युद्ध सराव करीत आहे. त्यासाठी आण्विक शक्‍तींवर चालणाऱ्या पाणबुड्या व घातक हत्यार त्यांनी तेथे तैनात केल्या आहेत. रशियाकडून अतिशय घातक असे “पोसायडन 2 एम 39′ हे वेपन्स या पाणबुड्यावर तैनात आहेत. रशियाचे ते सुपर वेपन्स मानले जाते. याचा वापर झाला तर आर्क्‍टिक प्रदेशात किरणोत्सर्गाने त्सुनामी निर्माण होऊ शकते. तसे झाले तर या मानवनिर्मित त्सुनामीचा फटका अमेरिकेच्या सागरी भागाला बसू शकतो. या धोक्‍याची दखल जागतिक माध्यमातून घेतली गेली आहे. आर्क्‍टिक भागात कृत्रिम त्सुनामी निर्माण करण्याची क्षमता रशियाकडे “पोसायडन’ या हत्यारामुळे आली असल्याची चर्चा आहे.

अमेरिकेने नॉर्वेजवळ केलेला युद्ध अभ्यास पाहता रशियाने त्याचाच कित्ता गिरविला आहे. या प्रदेशाचे नियंत्रण आर्क्‍टिक कौन्सिलच्या आठ देशांकडे आहे. त्यात अमेरिकेसह रशिया देखील आहे.रशियाचा वरील युद्धसराव अन्‌ भविष्यातील धोक्‍याबाबत अमेरिका व अन्य देशांची भूमिका काय असेल, याची उत्सुकता आहे. एकूणच पुतीन यांना देशांतर्गत स्वतःचा व देशाबाहेर रशियाचा दरारा निर्माण करावयाचा आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला फुटलेले धुमारे याचेच निदर्शक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.