“वसुली सरकार’ लोकांच्या जीवाशी खेळते आहे

केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा घणाघाती आरोप

नवी दिल्ली – केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातलं “वसुली सरकार’ कोरोना संकटाबाबतीत गंभीर नसल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे समुपदेशन केले. त्यांना सर्व साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. तसंच मदतीसाठी केंद्रीय पथके पाठवली. पण आता महाराष्ट्र सरकारच्याच प्रयत्नांमध्ये अभाव असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

 

 

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीला आणि मृत्यूदर वाढण्यामागेही सरकारचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू आहेत. एवढेच नव्हे तर जगात सर्वाधिक चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच आहे. याठिकाणी चाचणी योग्य पद्धतीने होत नसून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे कामही होत नाही. राज्य सरकारने जारी केलेले निर्बंध इतके ढिसाळ आणि संभ्रमात टाकणारे आहेत की, हे सरकार यातून नक्की काय साधतंय हेच समजत नाही. आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्‍यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठीही सरकारची कामगिरी चांगली नाही. सरकार “वैयक्तिक वसुली’ करण्यासाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सवलत देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा धोका वाढत आहे, हे पाहणं धक्कादायक आहे. एकंदरीतच, राज्य एका संकाटातून दुसऱ्या संकटात अडकले आहे. दुसरीकडे राज्याचं नेतृत्व आनंदाने आराम करत असल्याचं दिसतं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरून केलेली वक्तव्य ऐकली. हा करोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठीचाच प्रयतक्‍ आहे. या संदर्भात जबाबदारीने वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भिती निर्माण केली जात आहे, असा गंभीर आरोपही डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.