सोमेश्वरनगरमधील मुख्य करंजेपूल चौक फुल विक्रेत्यांनी गजबजला
वाघळवाडी- दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना मोठी मागणी असल्याने सोमेश्वरनगर मुख्य चौकासह विविध ठिकाणी फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलो दर मिळाल्याने यंदा झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळाला. दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व असते. आपट्याच्या पेंडीचा दर 10 रुपये होता. त्यामुळे फुलांची खरेदी करण्यासाठी सोमेश्वरनगर परिसरातील आसपासच्या भागांतून झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली होती. विक्रेते व शेतकरी झेंडू विक्री करता घेऊन आले होते. ग्राहकांनी प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात गर्दी करत खरेदी केली.
- तयार पुष्पहारांनीची मागणी वाढली
तयार पुष्पहारामध्ये विविध प्रकारच्या रंगांची फुले वापरली जातात. ती दिसण्यात आकर्षक असतात, त्यामुळे रोजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामधून वेळ मिळत नसल्याने झेंडूची फुले घेऊन पुष्पहार करण्यापेक्षा तयार पुष्पहार घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून आले. मुख्य दरवाजा चौकट, दुकान, मशनरी, दुचाकी, चारचाकी, मोठी वाहने यांच्या पूजेसाठी तयार पुष्पहारांनी ग्राहकांकडून पसंती मिळाली, या तयार पुष्पहारांच्या दुकानांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. व्यावसायिक व चाकरमानी पुष्पहार विक्रीचा ऑर्डर देण्यात गुंग होते. तयार पुष्पहारांची 50 रुपयांपासून पुढे विक्री होत होती.