पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ?

विद्यापीठाकडून विचार सुरू : सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा विचार सुरू आहे. एवढेच नव्हे, तर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेणार असल्याचे गुरुवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले.

पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरुवारी झाली. राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही भरणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यावर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती एकत्रित करीत येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शुल्क माफ करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले.

दरम्यान, पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अल्पदरात भोजनाची व्यवस्था, या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा ठराव मांडण्यात आला. त्यावर येत्या आठवड्यात सर्वसमावेशक योजना हाती घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्‍ती व संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याबाबत विचार सुरू असून, त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.