रेडा -इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या सर्वेक्षण करण्यासाठी तब्बल पाच कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, शेटफळ हवेली तलाव, डाळज, कालठण नंबर 1, 2, मौजे शिरसोडी या उजनी जलाशयातील बुडीत बंधारे तसेच विविध वळन योजना, खोरोची बॅरेज, लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही कामे मार्गी लागून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचा कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठ मागील दोन महिन्यांत जलसंपदा मंत्री व संबंधित शेतकरी शिष्टमंडळ यांच्यासमवेत मुंबई येथे महत्त्वाच्या दोन बैठका घेण्यात आल्या. जलसंपदा विभागाने कामासाठी निधी देण्यासाठी भूमिका घेतल्यानंतर याच कामांचे सर्वेक्षण करण्यासाठी पाच कोटीचा निधी पवार यांनी उपलब्ध करून दिला आहे.
हे सर्वेक्षण तात्काळ केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले शेती सिंचनाची कामे
मार्गी लागणार आहेत. उजनी जलाशय भागात बुडीत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना बंधाऱ्यांचा फायदा होऊन शेती ओलिताखाली येणार आहे.
खास बाब म्हणून वळण योजना देखील कार्यन्वित करण्यात येणार आहे. खोरोची येथील बॅरेज लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना वरदान ठरणार आहे. शेटफळ हवेली तलावाची रखडलेली कामे सर्वेक्षण झाल्यानंतर तात्काळ सुरू केली जातील. यामध्ये कोठेही जलसंपदा विभाग निधी देताना कमतरता येणार नाही, अशीही ग्वाही भरणे यांनी दिली.