पुणे- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणे याने केलेल्या सुरेख शतकी खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघावर 4 गडी राखून विजय मिळवला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात सलामीचा फलंदाज धीरज फटांगरेला कोल्हापूरच्या मनोज यादवने दुसऱ्याच षटकात बाद केले, तेव्हा रत्नागिरी संघ 1.3 षटकात 1 बाद 9 अशा स्थितीत होता.
त्यानंतर प्रीतम पाटीलने अवघ्या 32 चेंडूत 5 चौकार व 6 षटकाराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. प्रीतमला तुषार श्रीवास्तवने 40 चेंडूत 32 धावांची खेळी करून साथ दिली.
त्यानंतर कोल्हापूरच्या शिस्तबद्ध गोलंदाजी समोर रत्नागिरीच्या फलंदाजांना फारशी फटकेबाजी करता आली नाही, पण अखेरच्या षटकात रत्नागिरीच्या किरण चोरमले 27, अझीम काझी नाबाद 18, निखिल नाईक नाबाद 16 यांनी छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला 176 धावा उभारून दिल्या.
याच्या उत्तरात कोल्हापूर टस्कर्स संघाने 19.4 षटकात 6 बाद 181 धावा करून हे आव्हान पूर्ण केले. केदार जाधव (6 धावा), सचिन धस (13 धावा) हे दोघे झटपट बाद झाल्यामुळे कोल्हापूर संघ 7.1 षटकात 2 बाद 46 धावा असा अडचणीत सापडला.
त्यानंतर महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणेने सुरेख खेळी करत 60 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावांची शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सहाव्या गड्यासाठी अंकित बावणेने तरणजीत सिंह ढिलोनच्या साथीत 40 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.
अखेरच्या षटकात कोल्हापूर संघाला 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. अंकितने षटकार खेचत संघाला विजयाच्या आणखी नजीक नेले. त्यानंतर अंकितने एक धाव घेतली व 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना स्ट्राईकवर असलेल्या मनोज यादवने विजयी षटकार खेचला.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : 20 षटकात 4 बाद 176 धावा. (प्रीतम पाटील 69, तुषार श्रीवास्तव 32, किरण चोरमले 27, अझीम काझी नाबाद 18, निखिल नाईक नाबाद 16, श्रेयस चव्हाण 1-27, अक्षय दरेकर 1-26, तरणजीत सिंह ढिलोन 1-28) पराभुत वि.
कोल्हापूर टस्कर्स : 19.4 षटकात 6 बाद 181 धावा. (अंकित बावणे नाबाद 105, तरणजीत सिंह ढिलोन 21, सचिन धस 13, सिद्धार्थ मराठे 10, मनोज यादव नाबाद 7, प्रदीप दाढे 3-31, कुणाल थोरात 1-27, निकित धुमाळ 1-22).