वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षाचे निवासस्थान असलेल्या येथील व्हाईट हाऊस परिसरात एका अज्ञाताने गोळीबार केला. त्यावेळी तेथील सुरक्षा जवानांकडूनही प्रतिगोळीबार करण्यात आला. तेथे ही चकमक सुरू झाली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काही सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये एका सुरक्षित ठिकाणी हलवले होते.
आज नेहमीप्रमाणे व्हाईट हाऊसच्या पत्रकार कक्षामध्ये अध्यक्ष ट्रम्प हे पत्रकारांना संबोधित करीत होते.
तेवढ्यातच हा प्रकार घडल्याने त्यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी तेथून काही काळासाठी बाहेर नेले. तथापि काहीं मिनीटांनंतर अध्यक्ष पुन्हा या परिषदेच्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी व्हाईटहाऊसच्या बाहेर एका व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती दिली.
सुरक्षा दलानेही त्याच्यावर गोळीबार केला असून हल्लेखोर यात जायबंदी झाला आहे. त्याला ताब्यात घेऊन रूग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षांनी पत्रकारांना दिली.
हल्लेखोराचा हेतू मात्र समजू शकलेला नाही. त्याची ओळखही अजून जाहीर करण्यात आलेली नाही. व्हाईट हाऊसकडे जाणाऱ्या 17 क्रमांकाच्या रस्त्यावर हा प्रकार झाला. पण अल्पकाळातच हल्लेखोर जायबंदी झाल्यामुळे ही चकमक थांबवली. आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना ट्रम्प यांनी धन्यवाद दिले.
या प्रकारामुळे आपण घाबरला आहात काय? असा प्रश्न पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारला असता ते म्हणाले की, मला माहिती नाही, पण मी घाबरलेला किंवा हादरलेला दिसतो आहे काय असा सवाल त्यांनी पत्रकारांनाच विचारला.
हा प्रकार व्हाईट हाऊस संकुलाच्या बाहेर घडला. यामुळे व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदली गेलेली नाही असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले.