पुणे – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बारा ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्या. शहरात गुरूवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली. घराच्या छतांवर साठलेला पालपोचाळा तसेच कचऱ्यावर पेटते फटाके पडल्याने बारा ठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
सिंहगड रस्त्यावरील नवशा मारूती मंदिर परिसरात सायंकाळी आग लागली. येरवडा, प्रभात रस्ता, कोथरूड, सहकारनगर, गुरूवार पेठ, मुंढवा भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. बहुुुतांश ठिकाणी आग लागण्याचे प्रकार किरकोळ स्वरुपाचे होते. घराच्या छतावर साठलेला पालापाचोळ्यावर तसेच झाडांवर पेटते फटाके पडल्याने आग लागण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी पेटते फटाके कचऱ्यावर पडल्याने कचरा पेटण्याच्या घटना घडल्या. एके ठिकाणी घरात किरकोळ स्वरुपाची आग लागली.
यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजल्यानंतर रात्री उशीरापर्यंत शहरात ठिकठिकाणी आतिषबाजी करण्याचे प्रकार सुरू होते. कोंढवा परिसरातील उंड्री परिसरात गुरूवारी सायंकाळी महावितरणचा रोहित्राला अचानक आग लागल्याने तेथून निघालेला पादचारी जखमी झाला. त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.