लोणी देवकर, (वार्ताहर) – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान-मोठे उद्योग व्यवसाय कार्यरत आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या अनेक कारखान्यांमध्ये दररोज हजारो कामगार आणि शेकडो वाहनांची वर्दळ होत असते.
मात्र, नुकत्याच झालेल्या या औद्योगिक विकास महामंडळाच्या रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली होती. मागील काही महिन्यांपूर्वीच या रस्त्यांची नामधारी मलमपट्टी करून त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला गेला होता याविषयी दै. प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि अखेर या रस्त्याचा कामाला वेग आला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गापासून औद्योगिक वसाहतीमधून पुढे निमगाव केतकी, व्याहळी, न्हावी आदी गावांना हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच अनेक लहान मोठ्या कारखान्यांच्या कच्च्या मालाची देखील याचा रस्त्यावरून वाहतूक होत असते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. याकडे औद्योगिक विकास महामंडळाचे लक्ष नसल्याचे स्थानिक कारखानदारांनी सांगितले होते. मात्र, प्रभातच्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने या रस्त्याचे काम सुरू केले.
तो विषय मात्र गुलदस्त्यात
संबंधित रस्ता हा डागलोजी करण्यासाठी वेगळी निविदा आणि तो करून झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ता करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची निविदा काढली असल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळाली आहे. जर तो अखंड रस्ताच नवीन करायचा असेल तर त्या रस्त्याची डागडुजी कशासाठी मग हा निधी नेमका ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी आहे की काय अशी विचारणा स्थानिकांमधून होत आहे. मात्र एकाच रस्त्याच्या दोन निविदा हा विषय अद्याप गुलदस्त्यातच आहे