वॉशिंग्टन: करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे सध्या सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसीसंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे.
“ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधला जात आहे. अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे.
करोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज 1 च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची 45 तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकन संशोधकांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्या स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले, त्यांच्या शरीरात व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीजची मोठया प्रमाणात निर्मिती झाल्याचे दिसून आले. करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात जितक्या अँटीबॉडीज आहेत, त्यापेक्षा हे प्रमाण जास्त होते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.