अभिनेता अभिषेक बच्चन याच्या चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ पोलिसांनी थांबवले. लखनौमधील बेगम हजरत महल पार्कमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. अभिषेक आणि टीमला चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली होती. परंतु, करोना प्रोटोकॉल पाहता चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
करोना प्रतिबंधक नियमांनुसार उद्याने, सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. मात्र, चित्रीकरणासाठी दुपारच्या वेळेत हे पार्क उघडण्यात आले होते. या चित्रीकरणादरम्यान लोकांनी या पार्कजवळ गर्दी केली होती.
त्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले. काही स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर असभ्य कृत्य केले, त्यानंतर पोलिसांनी हा जमाव पांगवला. दरम्यान, अभिषेक बच्चन याचा “द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.