FIDE Candidates Chess Tournament 2024 – भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने येथील कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत देशबांधव विदित गुजराथीचा पराभव करून चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या भारतीय भाऊ-बहीण जोडीसाठी रविवारचा दिवस चांगला ठरला. कारण प्रज्ञानंदची मोठी बहीण आर. वैशाली हिनेही बल्गेरियाच्या नुरग्युल सेलिमोवाचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.
पुरुष गटात डी’गुकेशला रशियाच्या इयान नेपोम्नियाच्चीचा भक्कम बचाव भेदण्यात अपयश आले, तर फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझाने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाशी बरोबरी साधली.
महिला गटात भारताच्या कोनेरू हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना चीनच्या टॅन झोंगी हिला बरोबरीत रोखले. चीनच्या टिंगजी लेईने रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबत बरोबरी साधली. रशियाची कॅटेरिना लेग्नो आणि युक्रेनची अँना मुझीचुक यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला.
FIDE Candidates Chess Tournament 2024 : आर. प्रज्ञानंदची पहिल्या फेरीत बरोबरी…
पुरुष आणि महिला या दोन्ही गटात प्रत्येकी आठ खेळाडू सहभागी होत आहेत आणि या दुहेरी राऊंड रॉबिन स्पर्धेत अद्याप खेळाच्या 11 फेऱ्या बाकी आहेत.
पुरुष गटात कारुआना, गुकेश आणि नेपोम्नियाची हे दोन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर विदित आणि प्रज्ञानंद यांचा क्रमांक लागतो. महिला गटात झोंगी अडीच गुणांसह आघाडीवर आहे. तिच्याकडे गोर्याचकिनावर अर्ध्या गुणांची आघाडी आहे. हम्पी, वैशाली आणि लेग्नो समान दीड गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.